Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

१० एप्रि, २०२०

लॉक डाऊन आणि जीवन व्यवस्थापन

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक आणि लॉकडाऊन - १

२५ मार्चपासून पंतप्रधानांनीं भारतात लॉकडाऊन जाहीर केला आणि देशातील जवळजवळ सर्व उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये, बरीचशी सरकारी कार्यालये बंद झाली. हा लॉकडाऊन १५ एप्रिलला संपेल किंवा वाढवलाही जाऊ शकतो. जगावर गेल्या १०० वर्षात या पद्धतीचे आलेले हे बहुधा पहिले संकट. जवळपास कोणताही देश या संकटापासून दूर नाही. कमी अधिक फरकाने सर्वच देशांना या संकटाशी सामना करायला लागतो आहे. 

भारत सुद्धा या आरोग्य संकटाशी सामना करायला सज्ज झाला आहे. आज ना उद्या हे संकट टळेल पण संकटानंतरची जी परिस्थिती असेल त्याचा किती जणांनी विचार केला आहे. सध्यातरी सोशल मीडियावर “जीव वाचवणे” आणि “वेळ घालवणे” या दोनच गोष्टीसंबंधी बोलले जातंय. काही लोक ऑनलाईन कोर्सेस किंवा मिटींग्सच्या माध्यमातून या वेळेचा उपयोग करत आहेत असे दिसते. पण या पलीकडे “उपजीविका वाचवणे” हे फार मोठे आव्हान लॉकडाऊननंतर असणार आहे. 

अर्थतज्ज्ञ अशी भीती व्यक्त करत आहेत की  लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था सुस्थितीत येण्यासाठी २-३ वर्षाचा काळ लागू शकतो. या काळात बहुतेक उद्योगधंद्यांची उलाढाल कमी होणार आहे त्यामुळे बेरोजगारी वाढण्याचाही धोका आहे. तसेच काही व्यवसाय बंदही पडू शकतात. 

या पोस्टचा उद्देश “सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक” यांनी  या परिस्थितीत काय करावे हे सुचवण्याचा आहे. 

या परिस्थितीत पहिलं पाऊल उचला ते “संवादाचे”. 

१) सर्वप्रथम स्वतः:शी संवाद करा. आपण/आपला व्यवसाय कुठे आहे? कसा आहे? आपली बलस्थाने काय आहेत आणि कोणते इतर धोके आपल्यासमोर आहेत? आपला व्यवसाय किती दिवस आर्थिक तंगी सहन करू शकतो? परत सुस्थितीत येण्यास किती वेळ लागू शकतो? आपल्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांना आपण किती दिवस आणि किती प्रमाणात वेतन देऊ शकतो? कोणत्या पद्धतीने आपण लवकरात लवकर या अरिष्टातून बाहेर पडू शकतो? या आणि इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करा. 

२) यानंतर तुमच्या व्यवसायातील प्रमुख व्यक्तींशी (व्यवस्थापकीय कर्मचारी) संवाद करा. त्यांच्याकडून सूचना मिळवा. व्यवसायाचे पुनर्नियोजन कसे करता येईल यासंबंधी चर्चा करा. तुमच्या कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची मते जाणून घ्या. 

३) कर्मचारी: तुमची “टीम” ही तुमच्या व्यवसायातल्या यशातील सर्वात महत्वाची घटक. येणाऱ्या समस्येची जाणीव त्यांना करून द्या. या कठीण काळात तुम्ही त्यांच्याबरोबर आहात याची त्यांना जाणीव करून द्या. सध्या त्यांच्यासमोर कोणत्या समस्या आहेत का याची माहिती करून घ्या. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचा व्यवसाय 
लॉकडाऊननंतर चालवणारच आहात याची त्यांना खात्री करून द्या. त्यांच्या कडूनही काही सूचना मिळवण्याचा प्रयत्न करा. 

४) पुरवठादार: तुमच्या व्यवसायात इतर अनेक व्यावसायिक तुम्हाला सेवा/वस्तू (कच्चा माल) पुरवत असतात. तुमच्या व्यवसायावर जसा या मंदीचा परिणाम होणार आहे तसाच परिणाम त्यांच्याही व्यवसायावर होणार आहे. त्यांच्याशीही संवाद साधून या परिस्थितीत ते सुरक्षित आहेत ना याची विचारपूस करा आणि आपण त्यांच्याबरोबर आहोत व जर काही त्यांची उधारी शिल्लक असेल तर ती आपण वेळाउशिराने का होईना चुकवूच याची खात्री त्यांना करून द्या. 

५) ग्राहक: हा तर तुमच्या व्यवसायाचा देव. तुमच्या नियमित ग्राहकांशी संवाद साधणेही तितकेच महत्वाचे आहे. तुमच्या व्यवसाय हा त्यांच्यावरच अवलंबून असतो. त्यांची सुरक्षितताही जाणून घ्या. त्यांच्या पेंडिंग ऑर्डर्स लॉकडाऊननंतर पूर्ण केल्या जातील याची त्यांना खात्री करून द्या.

६) बँकर्स: तुमच्या व्यवसायाचे बँक खाते असलेल्या शाखेच्या व्यवस्थापकाशी संपर्क करून सरकारने अथवा त्या बँकेने या परिस्थितीत व्यावसायिकांसाठी काही विशेष योजना आणल्या आहेत का याची माहिती करून घ्या. त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु करा. जितक्या लवकर तुम्ही हे कराल तितक्या लवकर तुमचा व्यवसाय पूर्वपदावर येण्यास मदत होईल. कारण लॉकडाऊननंतर सर्वात जास्त चणचण ही खेळत्या भांडवलाची असणार आहे. 

७) आर्थिक सल्लागार: यापुढचा संवाद असणार आहे तुमच्या आर्थिक सल्लागाराशी (चार्टर्ड अकाउंटंट). तुमच्या व्यवसायाचे आर्थिक गणित कसे बिघडू शकते व ते तसे बिघडू न देण्यासाठी काय पूर्वतयारी करावी किंवा काय खबरदारी घ्यावी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करा. 

८) कुटुंब: तुम्ही जो व्यवसाय करताय तो तुमच्या कुटुंबासाठी. तुमच्या कुटुंबाला येणाऱ्या संकटाची जाणीव करून द्या. आधीची जीवनशैली काही दिवस /महिने/वर्षे विसरायला लागेल याची त्यांना जाणीव करून द्या. त्यांची  साथ या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. 

हे माझे विचार आहेत. प्रत्येकाला पटतीलच किंवा उपयोगी पडतीलच असे नाही. बघा संवाद करून. 

#Repost

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा